लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. सर्व पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी चंद्रपूरचे आणि गडचिरोलीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांची प्रचारसभा घेतली. यावेळी प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात करण्यात आलेली विकासकामे आणि राज्यात सुरु केलेले प्रकल्प यांच्याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर होते. आज त्यांनी सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच कडू अशी मराठी म्हण आहे. ही म्हण काँग्रेसला एकदम लागू होते. जिथे सत्ता मिळेल तिथे भरपूर मलई खायची हा इंडी आघाडीचा मूलमंत्र आहे. इंडी आघाडीने देशाला अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ते कधीही बदलू शकत नाही. यामुळे काँग्रेस पक्ष देशातील जनमत गमावून बसली आहे. काँग्रेसच्या घोषणापत्रात मुस्लिम लीगची भाषा वापरली गेली आहे.”
पंतप्रधान मोदींनी आज मोरा येथील सभेतील आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. आज देशात गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे झाली आहेत. या सभेच्या सुरुवातीने पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. दरम्यान राज्यात महायुतीने ४५ + पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान आजच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हंसराज अहिर आणि महायुतीचे ज्येष्ठ, वरिष्ठ नेते उपस्थित होते.