आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. दोन्ही संघांमधील हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली, मात्र अखेर हैदराबादला विजयाची नोंद करण्यात यश आले, तर पंजाबचा पराभव झाला. सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा रोमांचकारी सामन्यात 2 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिलेल्या 183 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाबचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावाच करू शकला.
पंजाबकडून शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. शशांकने 25 चेंडूत 46 धावा केल्या, तर आशुतोष 15 चेंडूत 33 धावा करून नाबाद राहिला. सॅम कुरनने 29 धावांचे योगदान दिले.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी युवा फलंदाज नितीश रेड्डी याने 37 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही.
पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांत एकूण चार बळी घेतले, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हैदराबादने या मोसमातील तिसऱ्या विजयाची चव चाखली आहे.