*श्री स्वामी समर्थ अक्कलकोट*
इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य असलेले श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंहसरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रुपाने प्रकट झाले. श्रीशैलम् जवळील कर्दळीवनात ते प्रकट झाले. तेथून त्यांनी भारतभर भ्रमण केले.
इसवी सन १८५६ च्या सुमारास स्वामी अक्कलकोटला आले.
चैत्र शुध्द द्वितीया शके १७७८, अनल नाम संवत्सर रविवार दि.०६/०४/१८५६ या दिवशी स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून अक्कलकोटास आले.
इ. सन १८५६ला महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामींच्या दर्शनासाठी आले. तेव्हा स्वामींनी त्यांना ही लढाईची वेळ नाही असे सांगितले.
इ. सन १४५९ मध्ये श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्यानंतर श्रीशैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले.
कर्दळीवनात त्यांनी सुमारे ३०० वर्षे कठोर तपश्चर्या केली.या काळात त्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारुळ केले.
एकदा उध्दव नावाचा एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत असताना त्याची कुऱ्हाड वारुळावर पडली. त्यावेळी दिव्य प्रकाश निर्माण झाला व त्याच्यासमोर एक आजानुबाहू मूर्ती उभी राहिली. तेच श्री स्वामी समर्थ महाराज अशी आख्यायिका सांगितली जाते.
स्वामींनी पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट असे भ्रमण केले.
अनेक लोकांना यथायोग्य मार्गदर्शन करुन चिंतामुक्त व भयमुक्त केले. अक्कलकोट येथे त्यांचे २२ वर्ष वास्तव्य होते. आज अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला आले आहे. त्यांनी सद्गुरू रामानंद बीडकर यांना दिक्षा दिली. अनेक भक्तांचे दुःख दूर केले.
श्री स्वामी सयर्थ महाराज यांनी ३० एप्रिल १८७८ रोजी(चैत्र वद्य त्रयोदशी शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे ‘वटवृक्ष समाधी स्थानी’ आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. त्यानंतर ते कर्दळीवनात लुप्त झाले.
आजही स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत अशी भक्तांची श्रध्दा आहे.
हर्षदा बेडेकर
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत