काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. प्रचार करून परतत असताना नाना पटोले यांच्या गाडीला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ही घटना भंडाऱ्यात घडली आहे. काल (9 एप्रिल) रात्रीच्या सुमारास प्रचारानंतर सुकाळी या गावी जात असताना नाना पटोले यांच्या गाडीला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
हा अपघात एवढा भीषण होता की नाना पटोले यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवानं या अपघातात नाना पटोले आणि इतरांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, या अपघातानंतर काँग्रेसनं हा घातपात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसंच या अपघातावरून काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप देखील केले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.”
https://twitter.com/atullondhe/status/1777930409612919156
अतुल लोंढे यांनी केलेल्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हा घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, हा अपघात चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.