केरळमधील सायरो मालाबार कॅथलिक चर्चच्या अधिपत्याखाली येणाऱ्या इडुकी डायोसिज या संस्थेने किशोरवयीन मुला-मुलींना प्रेमप्रकरणातील धोके समजावून देण्यासाठी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे प्रसारण आयोजित केले होते. सोरो-मलाबार चर्चच्या निमित्ताने उन्हाळी सुट्टीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी हा चित्रपट दाखवून त्यावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चेच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष फ्रा. जिन्स करक्कट यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा चित्रपट दाखविला. २ ते ४ एप्रिल दरम्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या कार्यक्रमात चित्रपट दाखविण्यासंदर्भातला उल्लेख केलेला होता. लव्ह जिहादच्या विरोधात लढणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा महत्त्वाचा भाग होता.प्रत्येक सुटीच्या दिवसात विद्यार्थ्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो, यासाठी विशिष्ट विषय निवडले जातात आणि पुस्तके तयार केली जातात.असे फादर करक्कट यांनी सांगितले.चित्रपटात दाखवण्यात आलेल्या “अशा धोक्यांबद्दल आमच्या मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आमचा हेतू होता,” असेही त्यांनी सांगितले.
मात्र चर्चच्या या कृतीबद्दल केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी सतीशन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, द केरला स्टोरी या चित्रपटाची कथा ही सत्यावर आधारित नाही. या चित्रपटातून केरळचा अवमान झाला आहे. केरळमध्ये जे झालेच नाही, ते यातून दाखविले गेले. अश्याच प्रकारचा विरोध त्यांनी दूरदर्शन वर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे प्रसारण झाले त्याही वेळेला केला होता.
तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, “या चित्रपटाला केरळमधील सर्वच भागातून आणि सर्व समाजातून पाठिंबा मिळाला आहे. केरळमधील शेकडो मुली लव्ह जिहादच्या शिकार झालेल्या आहेत. त्यामुळे चर्चच्या या कृतीचे आम्ही समर्थन करतो”.