उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर त्यांना धमकी मिळाल्यानंतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या धमकीनंतर आंदोलन करणाऱ्या संघटनांनी आमला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा फोटो असभ्य पद्धतीने एडिट करून फेसबुकवर व्हायरल करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यात शिरच्छेदाच्या ऑडिओचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.
संघटनांच्या नेत्याने सांगितले की, “फैज रझा नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा फोटो आणि त्यांचे डोके त्यांच्या शरीरापासून वेगळे केल्याचे आणि वाईट शब्द लिहिण्यात आलेले स्टेटस पोस्ट केले आहेत. यात ‘सर तन से जुडा’ या गाण्याचाही समावेश आहे. या सर्व कृती वातावरण बिघडवत आहेत. त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई केली जावी.”
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फैज रझा याच्या विरोधात कलम 505 (2) नुसार धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेबाबत पोलीस सतर्क असून त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी हिंदू संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांची तक्रार गांभीर्याने घेतली असून चौकशीसाठी कारवाई केली जात आहे. आपत्कालीन परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे याआधीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धमक्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत पोलीस सतर्क आहेत.