पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात अलीकडच्या तीस-पस्तीस वर्षांत पुरातत्त्व विभागाच्या सूचनांकडे काणाडोळा करून अनेक प्रकारची कामे केल्याने मूर्तीला आणि मंदिराला धोका निर्माण झाला होता. आता पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्यात आले असून चौखांबी,सोळखांबी, बाजीराव पडसाळी येथील दगडी कामावर साचलेली धूळ स्वच्छ करण्याचे, भिंतींना पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामांमुळे विठुरायाच्या राऊळाला नवी झळाळी येऊ लागली आहे. काम झाल्यावर सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या स्वरूपातील मंदिर भाविकांना पाहता येणार आहे.
मंदिरातील चार दरवाजांवर चांदीचे आवरण बसवले जाणार आहे. याशिवाय गाभाऱ्यासमोरील चौखांबीत प्रवेशाचा दरवाजा आणि गाभाऱ्याच्या कमानीवरही चांदी बसवली जाणार आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या काळात श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी अनेक प्रकारची कामे केली आहेत. गाभाऱ्यातील जुन्या दगडांवर ग्रॅनाईट बसविण्यात आले तर अन्य भागात फरशा बसवण्यात आल्या होत्या . दुरुस्तीसाठी अनेक प्रकारची कामे केल्याने मंदिराच्या भिंतींवरील वजन वाढले होते. मंदिराच्या भिंतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या, तर काही ठिकाणी भिंतींतून झाडे उगवली होती. या सर्व गोष्टींमुळे मंदिराला आणि मूर्तीला धोका निर्माण झाला होता.
आता मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार आराखडा तयार केला असून, त्याला शासनाने मंजुरी देऊन ७१ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिलेली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे सध्या वेगाने सुरू झालेली दिसून आहेत.
विठुरायाच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढताना मूर्तीस कोणताही धोका होऊ नये यासाठी मूर्तीवर बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. गाभाऱ्यातील कामे सुरू असल्याने पदस्पर्श दर्शन बंद करून सध्या पहाटे पाच ते सकाळी ११ या वेळेत भाविकांना केवळ मुखदर्शन घेण्यासाठी मंदिरात सोडले जात आहे.
सुशोभीकरणाबरोबरच मंदिर पुढील अनेक वर्षे भक्कम राहावे यादृष्टीनेही विचार करून आवश्यक कामे जाणीवपूर्वक केली जात आहेत. मंदिराचे पहिल्या टप्प्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने कामाचा आढावा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.