जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपुर्ण घडामोडींचा आढावा घेऊयात या भागात.
1. 10 एप्रिल 1875 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाच्या स्थापनेचे उद्दिष्ट वैदिक धर्माची पुनर्स्थापना करून जातीय अडथळे तोडून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणणे हा होता. आर्य समाजाच्या मते, एकच देव आहे ज्याला ब्रह्म म्हणतात. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांना दैवी ज्ञान मानले आणि ‘वेदांकडे परत जा’ असा नारा दिला. धर्मांतरित झालेल्या लोकांना पुन्हा हिंदू होण्यासाठी प्रेरणा देऊन स्वामीजींनी शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या शुद्धीकरणाच्या चळवळीमुळे ज्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता ते स्वधर्मात परतले. स्वामी दयानंद सरस्वती यांनीही विधवा पुनर्विवाहाची चळवळ सुरू करून लोकांना जागृत केले. विधुर पुरुषाला जसा पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे, तसाच अधिकार स्त्रीलाही मिळायला हवा, असे ते म्हणाले होते. याशिवाय हिंदी भाषेच्या संवर्धनात स्वामीजींचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हिंदी भाषा स्वीकारली. त्यांच्या सर्व रचना आणि महत्वाचे समजले जाणारे पुस्तक ‘‘सत्यार्थ प्रकाश’’ हे मूळ हिंदी भाषेत लिहिले आहे.
2. 10 एप्रिल 1917 रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीचा पहिला सत्याग्रह सुरू झाला. हा चंपारण सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. चंपारणमधील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत होते. गांधींच्या या सत्याग्रहाने चंपारणमधील शेतकरी, शोषित आणि शोषितांना केवळ एक मार्ग दाखवला नाही, तर संपूर्ण देशाला शांततापूर्ण सत्याग्रहाच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.
3. 10 एप्रिल 1995 रोजी देशाचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे मुंबईत निधन झाले. ते पहिले पंतप्रधान होते जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडून इतर पक्षाचे होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे मोरारजी देसाईंनी अनेक वर्षे वेगवेगळ्या तुरुंगात घालवली. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी त्यांचे नाव राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे बनले होते. त्यानंतर 1952 मध्ये त्यांना मुंबईचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. 1967 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्री करण्यात आले. पण नंतर मात्र इंदिराजींशी असलेल्या वैचारिक मतभेदामुळे मोरारजी देसाई काँग्रेस सोडून जनता पक्षात गेले. 1977 मध्ये आणीबाणी संपल्यानंतर मोरारजी देसाई यांनी 24 मार्च 1977 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोरारजी देसाई यांनी 1977 ते 28 जुलै 1979 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले.
4. 10 एप्रिल 1982 रोजी देशातील पहिला बहुउद्देशीय उपग्रह, इनसॅट-1 ए, प्रक्षेपित करण्यात आला. ही देशातील पहिली दूरसंचार उपग्रह प्रणाली होती. हे फोर्ड एरोस्पेस या कंपनीने बनवले होते. आणि आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे चालवले जात होते. इनसॅट-1ए च्या दूरसंचार पॅकेजमध्ये दुहेरी कार्ये होती. हे देशाच्या दुर्गम भागात लांब पल्ल्याच्या टेलिफोन सर्किट्स आणि थेट रेडिओ आणि दूरदर्शन प्रसारण करू शकत होते. यामध्ये एकूण 12 ट्रान्सपॉन्डर बसवण्यात आले होते, जे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर काम करत होते. जेणेकरून दुर्गम भागात संवाद आणि दूरदर्शन कार्यक्रमाचे प्रसारण करणे सोपे झाले. . ग्रामीण भागात दूरचित्रवाणी आणि रेडिओ कार्यक्रम पुरवण्याबरोबरच, आपत्तीचा इशारा देण्यासाठी ट्रान्सपॉन्डरही बसवण्यात आले. तथापि, सततच्या समस्यांमुळे सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर जास्त गरम झाले आणि निकामी झाले. 4 सप्टेंबर 1982 रोजी, उपग्रहाचा ट्रॅकिंग सेन्सर देखील निष्क्रिय करण्यात आला. इस्रोच्या सांगण्यानुसार ,इनसॅट-1ए सप्टेंबर 1983 मध्ये बंद करण्यात आले.
५. 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे जहाज आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला निघाले. हे जहाज ब्रिटनमधील साउथॅम्प्टन बंदरातून 10 एप्रिल रोजी न्यूयॉर्कच्या प्रवासासाठी निघाले होते, चार दिवसांनंतर, म्हणजे 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागर समुद्रात हिमखंडाशी आदळल्यानंतर हे महाकाय जहाज समुद्रात बुडाले. या अपघातात 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची गणना जगाच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघातांमध्ये केली जाते. 1997 मध्ये ह्या घटनेवर दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिक नावाचा चित्रपट बनवला ज्यामुळे हे जहाज जगभर प्रसिद्ध झाले. टायटॅनिक या चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
6. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी मुंबईत झाला होता. गायनकला किशोरीताईंच्या रक्तातच होती कारण मोगूबाई कुर्डीकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न आणि जेष्ठ गायिकेच्या त्या कन्या होत्या. भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये किशोरीताई आमोणकर यांची गणना होते. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होत असे आणि रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल किशोरीताईंना १९८५ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९८७ साली पद्म भूषण, २००२ साली पद्म विभूषण हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अवघा रंग एक झाला, मी माझे मोहित, जनी जाय पाणियासी हे त्यांचे अभंग, तसेच म्हारो प्रणाम ही मीरेची भजने लोकप्रिय होती. जाईन विचारीत रानफुला, हे श्यामसुंदरा.. ही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली त्यांची गाणीही विशेष गाजली. सखोल चिंतनातून आलेल्या आपल्या हुकमी, दमदार गायनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अढळ स्थान मिळविणाऱ्या गानविदुषी, स्वरयोगिनी किशोरी आमोणकर ३ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले.
७. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया अर्थात आज आहे. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंहसरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रुपाने प्रकट झाले असेही सांगितले जाते. श्रीशैलम् जवळील कर्दळीवनात ते प्रकट झाले. तेथून त्यांनी भारतभर भ्रमण केले. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केलेशिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.अनेक लोकांना यथायोग्य मार्गदर्शन करुन चिंतामुक्त व भयमुक्त केले. अक्कलकोट येथे त्यांचे २२ वर्ष वास्तव्य होते. आज अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला आले आहे.