लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान एनडीएच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभर प्रचारसभा घेत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. पंतप्रधान मोदींनी आज रामटेकमध्ये प्रचार सभेला संबोधित केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडी आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. अनेक मुद्द्यांवरून मोदींनी काँग्रेसला घेरले.
आजच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”१९ एप्रिलला मोठ्या संख्येने मतदान करा. तुम्हाला केवळ एक खासदार नव्हे तर, पुढील एक हजार वर्षांचा पाय मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. विकसित भारतासाठी मतदान करायचे आहे. ज्यावेळी मोदींना शिव्या देण्याचे प्रमाण वाढले, ईव्हीएम मशीनबाबत आरोप सुरु झाले की समजून जा की अब की बार मोदी सरकार.”
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, ”विरोधक खोटं पसरवत आहेत की, मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल. मी जेव्हा राजकारणात आलो आहे तेव्हापासून अशी कोणतीही निवडणूक राहिलेली नाही ज्यामध्ये विरोधकांनी असे आरोप केले आहेत. इंडी आघाडीवाले कधीही गरिबांना पुढे जाऊन देऊ शकत नाहीत. गरीबाच्या या मुलावर विरोधकांनी कितीही हल्ला केला तरी मोदी देशाच्या विकासासाठी कधीही मागे हटणार नाहीत. ” आजच्या सभेला नितीन गडकरी, राजू पारवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, आशिष देशमुख, आशिष जैस्वाल आणि अनेक आमदार खासदार उपलब्ध होते. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दिसून आले.