विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह काल गारपिटीचा पाऊस कोसळला; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचा परिणाम पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला असून खेळत्या हवेमुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली.
हवामान विभागाने भंडारा जिल्हयात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला होता. तर काल रात्री जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. सकाळी सुध्दा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका भाजीपाला पीक तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला असुन आंब्याचे बार गळून पडले आहे.
सध्याच्या घडीला राजस्थानपासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो मध्य महाराष्ट्रातूनच पुढं जात असल्यामुळं राज्याच्या काही भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं विदर्भासह मराठवाड्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
राज्यावर असणारं पावसाचे सावट पाहता विदर्भ आणि नजीकच्या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच तापमानातही लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. सध्या विदर्भातील तापमान 40 अंशांहूनही कमी झालं असून, पावसासाठी अनुकूल परिस्थिती पाहता वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांमध्ये गारपीटीसह सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती असून,ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.