क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेहार्दिक आणि त्याच्या भावाला फसवल्याप्रकरणी वैभव पांड्याला अटक करण्यात आली आहे. पार्टनरशिप फर्ममधून ४.३ कोटी रुपयांची हेराफेरी आरोप त्याच्यावर आहे. २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसायात गुंतवणूक केली होती. हार्दिक आणि त्यांच्या प्रत्येकी ४० टक्के गुंतवणूक यात होती. तर या गुंतवणुकीत सावत्र भावाचा २० टक्के वाटा होता. या व्यवसायातून येणाऱ्या फायद्याचे तिन्ही भावांमध्ये समान वाटप होणार होते.
पण भागीदारी कराराचे उल्लंघन करून हार्दिक आणि त्याच्या भावाला न कळवता वैभवने त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरु केली. या सगळ्यामध्ये, मूळ भागीदारीचा नफा कमी झाला, ज्यामुळे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वैभवने गुपचूपपणे त्याचा नफा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्क्यांपर्यंत वाढवला, ज्यामुळे हार्दिक आणि त्याच्या भावाचे नुकसान झाले. तसेच वैभवने पार्टनरशिप फर्मच्या खात्यातून एक कोटी रुपये घेतले आणि लाखो रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. विरोध केल्यास तुझं नाव बदनाम करेल अशीही धमकी वैभवने हार्दिकला दिली असल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.