केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान देशभरात भाजपा म्हणजेच एनडीए आणि इंडी आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. आजच्या व्हिडिओत आपण चंद्र्पुर लोकसभा मतदारसंघाविषयी महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत . तेथील राजकीय ताकद, जातीये समीकरणे आणि तिथे तिकीट मिळालेले उमेदवार. आज चंद्रपूर लोकसभेची माहिती आपण पाहणार आहोत.
चंद्रपूरबदल बोलायचे झाल्यास चंद्रपूर या नावातच शीतलता आहे मात्र सूर्यदेव येथे आग ओकत असतो. त्यातच यंदाचं वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे येथील वातारण अधिकच तापले आहे. याच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने म्हणजेच महायुतीने विद्यमान आमदार, वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तर मविआ म्हणजेच काँग्रेसने बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. येथे विद्यमान खासदार हे बाळू धानोरकर होते. महत्वाचे म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर हे काँग्रेसकडून राज्यातील एकमेव खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे यंदा त्यांच्या पत्नीला काँग्रेसने तिकीट दिले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने राजेश बेल्ले यांना उमेदवारी दिली आहे.
आता चंद्रपूरच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल जाणून घेतल्यास येथील लोकसभेत यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभांच्या समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र सध्या इथे काँग्रेसची सत्ता आहे. हंसराज अहिर भाजपाकडून २००९ मध्ये दुसऱ्यांदा येथून निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नरेश पुगलियांचा पराभव केला. 2014 मध्ये खासदारकीची हॅटट्रिक करताना त्यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंना तब्बल सव्वा दोन लाखांच्या मताधिक्यानं पराभूत केले. मात्र २०१९ मध्ये चौथ्यांदा खासदार होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. काँग्रेसने राज्यात एकमेव चंद्रपूर हा लोकसभा मतदारसनाघ जिंकला आणि येथे बाळू धानोरकर हे खासदार झाले. सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. प्रतिभा धानोरकर या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून येतात. वणी माहेर आणि सासर चंद्रपूर असल्याने दोन्हीकडून त्यांना राजकीय फायदा होतो.बाळू धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते तोपर्यंत प्रतिभा या राजकारणात प्रत्यक्ष सक्रीय नव्हत्या. मात्र बाळू धानोरकर हे खासदार म्हणून निवडून गेले आणि प्रतिभा ताई यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. येथे त्या सक्षम उमेदवार ठरणार नाहीत असे अंदाज बांधण्यात आले, मात्र त्या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. यंदा त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. समाजकारणात देखील सक्रिय सहभाग असल्यांचे त्यांचा देखील जनसंपर्क दांडगा आहे.
आता सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास सुधीर भाऊ हे भाजपातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. अनेक वर्षे तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. बल्लारपूर विधानसभेतून सहा वेळा ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेन्द्रजी मुख्यमंत्री असताना ते राज्याचे अर्थमंत्री देखील राहिले आहेत. अभ्यासू व्यक्तीमत्व अशी मुनगंटीवारांची ओळख आहे. त्यांची मतदारसंघातील पक्षसंघटनेवरही पकड आहे. सुधीर मुनगंटीवार हे स्वतः लोकशा निडवणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र पक्षाचा आदेश पाळणे हे आपले कर्तव्य असल्याचे म्हणत ते आता लोकसभा लढविणार आहेत.
जातीचं राजकारण करून धानोरकरांनी गेल्यावेळी विजय मिळवल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी वंचितच्या उमेदवारानंही तब्बल लाखभर मतं घेतली होती. यंदा वंचितनं राजेश बेले यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाकडंही डोळेझाक करता येणार नाही. त्यामुळे मुख्य लढत ही भाजपा-काँग्रेस यांच्यात असली तरी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील किती मते मिळवितो आणि त्याचा फायदा कोणाला होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आधी चंद्रपुरातलाच भाग येत होता. पण, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनरर्चना होऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला.
चंद्रपूरची ओळख ही घनदाट जंगल, शेती आणि उद्योगांचा जिल्हा अशी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे आहे. कोळसा खाणी, सिमेंट, ऊर्जा निर्मिती उद्योग चंद्रपूरमध्ये आहे. मात्र यामुळे चंद्रपुरात प्रदूषण वाढल्याचे म्हटले जाते. शेतीबहुल जनता असली तरी सिंचनाच्या सोयी योग्य प्रमाणात अजूनही उपलब्ध नाहीयेत. मानव-वन्य जीव संघर्ष तर इथल्या जनतेच्या पाचवीलाच पुजलाय. मुंबईसाठी थेट रेल्वेची मागणी अजून मान्य झालेली नाही. सरकारी मेडिकल कोजेची इमारत पूर्ण झाली नसल्याने येथे रुग्णसेवा करताना ताण निर्माण होत आहे. असे प्रश्न अजूनही जैसे थे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हे प्रश्न आपला सोडविण्यासाठी आपले उमेदवार कशाप्रकारे त्यावर उपाययोजना करणार, किंवा प्रचार करणार याकडे देखील जनतेचे लक्ष आहेच.
सुधीर मुनगंटीवार स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र पक्षाने हंसराज अहिर यांचे तिकीट कापून मुनगंटीवार यांना तिकीट दिले. त्यामुळे अहिर व त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. मुनगंटीवार व अहिर यांच्यात देखील आलबेल नसल्याचे सांगितले जाते. तसेच चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार अपक्ष आमदार आहेत. त्यांचा महायुतीला पाठिंबा असला तरी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचं वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे जोरगेवार मुनगंटीवारांना मदत करतात का? हे बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत वाद आहेत. विजय वडेट्टीवार हे आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना तिकटी मिळावे यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करत होते. मुलीऐवजी तुम्हीच निवडणूक लढवावी असे पक्षाने सांगितले मात्र त्यांना ही ऑफर मान्य नव्हती. मात्र हायकमांडने प्रतिभा धानोरकरांवर विश्वास दाखवून त्यांचं तिकीट दिले.