आज (11 एप्रिल) कोलकाता येथील रेड रोड येथे आयोजित ईद-उल-फित्रनिमित्त आयोजित सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसंच “ही आनंदाची ईद आहे”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
बळ देण्याची ही ईद आहे. महिनाभर उपवास करून ही ईद साजरी करणे खूप मोठी गोष्ट आहे. देशासाठी आम्ही रक्त सांडायला, जीव द्यायला तयार आहोत, पण देशासाठी अत्याचार सहन करणार नाही. समान नागरी संहिता मान्य नाही, मला सर्व धर्मांमध्ये एकोपा हवा आहे. तुमची सुरक्षितता हवी आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि समान नागरी संहिता लागू होऊ देणार नाहीत. तसंच ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, निवडणुकीदरम्यान काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील. लोकांनी या कटाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
“आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि समान नागरी संहिता स्वीकारणार नाही. आपण एकजूट राहिलो तर कोणीही आपले नुकसान करू शकत नाही”, असेही बॅनर्जी म्हणाल्या.