कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघात श्रीमंत शाहू छत्रपती (Shrimant Shahu Chhatrapati) यांना महाविकास आघाडीने तिकिट दिलं आहे. तर भाजपने खासदर संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांच्या लढत होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संजय मंडलिक यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत बोलताना संजय मंडलिक म्हणाले की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत, त्यामुळे आम्ही, तुम्ही आणि कोल्हापूरची जनता ही खरी कोल्हापूरची वारसदार आहे.
माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला आहे. तसंच मल्लाला टांग मारायची नाही, हात मारायचा नाही. मग कुस्ती कशी होणार? असंही संजय मडलिक म्हणाले.
दरम्यान, संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानामुळे कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसंत आता यावर शाहु छत्रपती काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.