सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. एनडीए आणि इंडी आघाडीने देशभरात प्रचार सुरु केला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहे. तसेच भाजपाने देखील आपले स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशमधील निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी तो दिवस दूर नाही ज्या वेळेस भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश असेल, असे विधान केले आहे.
गुरुवारी मध्य प्रदेशात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्या विधानाचा संदर्भ दिला ज्यात ते म्हणाले होते की, “तुम्हाला भविष्य पाहायचे असेल तर भारतात या.” भविष्य अनुभवण्यासाठी, भारतात या. तुम्हाला भविष्यावर काम करायचे असेल तर भारतात या.” राजनाथ सिंह यांना भाजपाने लोकसभेचे तिकीट दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आज प्रगती करत आहे. मोदी सरकारने समाजाच्या प्रत्येक भागासाठी काम केले आहे. पुढील २० ते २५ वर्षांमध्ये भारत हा जगातील महाशक्ती असणारा देश असेल. जग आपल्याकडे आशेच्या नजरेने पाहत आहे. जगातील मोठे देशही ते स्वीकारत आहेत. राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. किसान सन्मान निधी म्हणून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येत असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे इत्यादी खरेदी करण्यात मदत होते. मात्र विरोधकही यावरही टीका करत आहेत.