लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपा व महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट दिले आहे. मात्र यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील हे प्रचंड नाराज झाले आहे. हीच नाराजी आता भाजपला भोवणार आहे. भाजपाने त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देखील केले. मात्र आता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्या उमेदवारीचा दावा केला होता. पण भाजपने माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटलांचा गट प्रचंड नाराज झाला आहे. तर भाजपच्या या निर्णयाने रामराजे नाईक निंबाळकर देखील नाराज झाले होते. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मोहिते पाटलांच्या प्रवेशाबद्दल सांगितले आहे.
शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे मला भेटून गेले. येत्या दोन दिवसांत ते पक्षात प्रवेश करणार आहेत. १४ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांना शरद पवार गटाकडून माढ्याची अधिकृत लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात निवडणुकीचा कलगीतुरा रंगणार आहे. तसेहच ही निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची देखील असणार आहे.