हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट (Maharashtra Weather Update Rain Alert) आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढत आहे.अकोला जिल्ह्यामध्येही वादळ आणि गारपिट झाली आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यातही त्याने वादळी हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांना विशेषतः लिंबू, संत्रा, आंबा, केळी च्या बागांना मोठा फटका बसला आहे. तसेच रब्बी, उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून नुकसानीची तीव्रता आणि क्षेत्र वाढतच चालले आहे.
गेले काही दिवस राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच काही भागांत गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह बऱ्याच ठिकाणी उकाड्यामध्ये प्रचंड वाढ होत आहे.