सातत्याने वाढणारे तापमान आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी, अत्यावश्यक औषधे, आइस पॅक, ओआरएस आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांचा आढावा घेण्यात आला.
पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2024 मध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्णता वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत आरोग्य मंत्रालयाचा सल्ला आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित केले जावे. याशिवाय उष्णतेच्या परिणामांना तोंड देण्याच्या तयारीचा मोठ्या प्रमाणावर आढावा घेण्यात आला.
बैठकीत, पंतप्रधान मोदींनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी टेलिव्हिजन, रेडिओ आणि सोशल मीडियासारख्या सर्व प्लॅटफॉर्मद्वारे विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये जनजागृती सामग्री प्रसारित करण्याचे निर्देश दिले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या सूचनांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात यावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.
पंतप्रधानांनी बैठकीत उन्हाळ्याच्या हंगामात जंगलातील आग लवकर विझवण्याची गरज देखील अधोरेखित केली. या बैठकीत ते म्हणाले की, शासनाच्या सर्व अंगांनी आणि राज्य व जिल्हा स्तरावरील विविध मंत्रालयांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. याशिवाय, रुग्णालयांमध्ये पुरेशी तयारी तसेच जनजागृतीवरही पंतप्रधानांनी भर दिला. या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृह सचिव, हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.