छ्त्रपती संभाजीनगर: संघ जे करतो ते योग्यच करेल अशी भावना ठेवून लाखो स्वयंसेवक काम करत आले, म्हणून आज हे विशाल स्वरूप आपण पाहू शकतो, परंतु ज्या समर्पण व त्यागामुळे ही स्थिती आली आहे ती कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते स्व. दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे व्यासपिठावर उपस्थित होते.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, “या वास्तूच्या उभारणीमुळे सर्वांना आनंद होतोय, पण हा आनंद ज्यांच्यामुळे आला त्यांची तपश्चर्या सर्वांनी पाहिलेली नाही. त्यामुळे आपण जे सुखद परिणाम पाहतो त्यामागे निष्काम परिश्रम आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, “ज्ञान आणि कर्म हे माणसाचे दोन पंख आहेत, ज्यामुळे परम पदापर्यंत जाता येते. पण त्यासाठी भक्ती आवश्यक आहे. भक्ती असेल तर सुखद क्षणापर्यंत जाता येते. राम मंदिरासाठी समर्पण करण्यासाठी प्रत्येक जण वाट पाहत होता. लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. जसे आपण आज वाट पाहत होतो तसे पाचशे वर्षापासून अनेकांनी वाट पाहिली. अनेकांच्या बलिदान, तपश्चर्या आणि प्रभू श्रीरामांच्या कृपेमुळे २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षण आपण अनुभवला. हे प्रेम, समर्पण आणि भक्तीमुळे घडले असे ते म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी वास्तूच्या उभारणीत योगदान दिलेल्या अण्णा पाटणकर , धनंजय पुंड (वास्तू विशारद) राजेश वरगंटवार, यशवंत दवणे, सुंदरलाल गुंजाळे, प्रदीप गुरांडे, आदित्य कासलीवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे कार्यवाह दिगंबर नाईक यांनी आभार व्यक्त केले. छत्रसाल पांडव यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस शारीरिक खेळांची माहिती देणारे ‘खेलकूद’ या ॲपचे डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यामध्ये १६ प्रकारात सहाशेहून अधिक खेळ समाविष्ट आहे. दिव्यांग, महिला व सर्व वयोगटातील लोकांसाठी यामध्ये खेळ समाविष्ट करण्यात आले आहे.
“दत्ताजी भाले व समर्पण दोन्ही शब्द एकच” – हरीश कुलकर्णी
रा. स्व. संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हरीश कुलकर्णी यांनी स्व. दत्ताजी भाले यांच्याविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले “समर्पण आणि दत्ताजी भाले ही दोन्ही नावे एकरूप आहेत. दत्ताजींना देश आणि समाज पुढे न्यायचा होता म्हणून त्यांनी आपले पूर्ण जीवन संघकामासाठी दिले. घरादाराचा त्याग केला. संघाच्या प्रतिकूल काळात त्यांनी मोठ्या संघर्षातून देवगिरी प्रांतामध्ये संघकाम वाढवले. आणीबाणीच्या काळातसुद्धा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आधार दिला, असे त्यांनी सांगितले.”
“विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी या वास्तूचा उपयोग होईल” – देवानंद कोटगिरे
स्व. दत्ताजी भाले स्मृती समिती कार्यालयाचे ११ एप्रिल २०२४ रोजी पू. सरसंघचालक मा . डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ‘समर्पण’ असे या वास्तूचे नामकरण झाले. स्व. दत्ताजी भाले स्मृती समिती न्यासाची स्थापना १९८० मध्ये झाली होती. स्व. दत्ताजी भाले हे संघाचे प्रचारक होते व मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
आर्थिक कारणांमुळे त्यावेळेस काही शक्य झाले नाही, परंतु संघाचे तत्कालीन कार्यकर्ते स्व. प्रल्हादजी अभ्यंकर, स्व. भाऊसाहेब जहागीरदार, स्व. मधुकरराव जोशी, श्री हरिभाऊ बागडे, श्री रामभाऊ गावंडे यांनी त्यावेळी एक एकर जागा घेऊन ठेवली होती. अलीकडच्या काळात काही कार्यकर्त्यांनी या इमारत बांधणीसाठी पुढाकार घेतला व ही वास्तू साकार झाली. या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना निवास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, ग्रामविकास, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, योगाभ्यास आदी प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे. श्री देवानंद कोटगिरे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस माहिती दिली. ते सध्या संस्थेचे वर्तमान अध्यक्ष आहेत.