भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये आणि चाहत्यांमध्ये चर्चिला जात आहे. कारण रोहित शर्मा हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि भविष्यात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार यावर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार? याबाबत अनेक दिग्गजांनी आपले अंदाज वर्तवले आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांचेही नाव जोडले गेले आहे.
नवज्योत सिंग सिद्धू हे सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्यात व्यस्त आहेत. बऱ्याच दिवसांनी ते आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असून लोक त्याच्या कॉमेंट्रीचा आनंदही घेत आहेत. दरम्यान, सिद्धू दररोज भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंबाबत आपले मत मांडत असतात. तर यावेळी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना त्यांनी टीम इंडियाच्या भावी कर्णधारावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मते, “हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा भावी कर्णधार असेल. सिद्धू यांचा असा विश्वास आहे की या पदासाठी तो नैसर्गिक निवड आहे, विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. हार्दिक पांड्या हा भविष्य आहे. रोहित आता 36-37 वर्षांचा आहे. त्याच्या कारकिर्दीत आणखी काही वर्षे शिल्लक आहेत. तो एक उत्तम कर्णधार आणि खेळाडू आहे. पण आता अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला त्याच्या पलीकडे पहावे लागेल आणि कोणीतरी येऊन त्याची जागा घेण्यासाठी मैदान तयार करावे लागेल.”
“मी हार्दिक पांड्याला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याच्या बाजूने नाही. पण, तो तुमचा उपकर्णधार आहे. तसेच हार्दिकने जवळपास एक वर्ष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे जेव्हा रोहित शर्मा उपस्थित नव्हता. त्यामुळेच बीसीसीआयने हार्दिकची संघाच्या उपकर्णधारपदी निवड केली आहे. तर बीसीसीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी ती बरेच नियोजन करेल आणि बरीच चर्चा होईल.”