दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार पाडण्यासाठी मोठे षडयंत्र रचले जात आहे. निवडणुकीत जिंकू शकत नसल्यामुळे भाजपला आपचे सरकार पाडायचे आहे. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत राजकीय षडयंत्र रचले जात असून राष्ट्रपती शासन लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नायब राज्यपालांनी गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रांवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. जुने प्रकरण हाती घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवाला बडतर्फ करण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल सरकार पाडण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकार आणि ईडीने खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली आहे. भाजपचे लोक दिल्लीत निवडणूक जिंकू शकत नाहीत, म्हणून त्यांना निवडून आलेले अरविंद केजरीवाल सरकार पाडायचे आहे असा आरोप त्यांनी केला.
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारसारख्या योजना भाजपला कधीच राबवता येणार नाही. दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मिळणार आहेत, भाजपवाल्यांना याचा त्रास आहे. ही योजना बंद पाडण्यासाठी हे राजकीय षडयंत्र रचले जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणे बेकायदेशीर ठरेल. गेल्या 17 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेत आपने आपले बहुमत सिद्ध केले आहे, जेव्हा सत्तेत असलेल्या पक्षाकडे बहुमत आहे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रचंड बहुमत असून भाजपने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा मार्लेना यांनी सांगितले.