दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता या ईडी कोठडीत आहेत. सध्या त्या तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली दारू घोटाळ्यारप्रकरणी सीबीआयने बीआरएसच्या नेत्या के. कविता यांना गुरुवारी अटक केली आहे. आज त्यांना सीबीआयने कोर्टात हजर केले. तसेच लाचखोरी प्रकरणात त्यांनी चौकशीला सहकार्य केले नाही व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत असे , सीबीआयने आपले म्हणणे मांडताना कोर्टात सांगितले. दरम्यान कोर्टाने के. कविता यांना सीबीआयची कोठडी सुनावली आहे.
दिल्लीतील दारू घोटाळ्या प्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या के. कविता यांना सीबीआयने तिहार जेलमधून अटक केली होती. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने के. कविता यांना १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. खरेतर, बीआरएस नेत्या कविता यांच्या कोठडीची मागणी कोर्टाकडून करताना, सीबीआयने सांगितले की, दक्षिण ग्रुपच्या एका मद्य व्यावसायिकाने अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला. केजरीवाल यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आमच्याकडे पुरेशी सामग्री, व्हॉट्सॲप चॅट्स आणि संबंधित आरोपींचे स्टेटमेंट आहेत असा युक्तिवाद सीबीआयने कोर्टात केला.
विशेष न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच के. कविता यांची तुरुंगात चौकशी केली होती. बीआरएस नेत्याला सहआरोपी बुची बाबूच्या फोनवरून मिळालेल्या व्हॉट्सॲप चॅट्स आणि जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांबद्दल चौकशी करण्यात आली.सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील ईडी कोठडीत आहेत. २१ मार्चला ईडीने त्यांना अटक केली आहे. सध्या कोर्टाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने के. कविता यांना १५ मार्च रोजी हैद्राबाद येथील निवासस्थानावरून अटक केली आहे.