आज (12 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजस्थानमधील बारमेर येथील प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) सडकून टीका केली. खुद्द बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) जरी आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत, असं वक्तव्य यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा निवडणूक येते त्यानंतर संविधानावरून खोटं बोलणं ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. ही अशी काँग्रेस आहे जिनं बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांना निवडणुकीत हरवलं, ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही. तसंच काँग्रेसनं देशात आणिबाणी लागू करून संविधान संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आज तिच काँग्रेस मोदीला शिव्या देण्यासाठी संविधानाच्या आडून खोटं बोलत आहे.
मोदी असे आहेत ज्यांनी देशात पहिल्यांदा संविधान दिन साजरा करणं सुरू केलं. मात्र, याला काँग्रेसवाल्यांनी विरोध केला होता. हा बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान आहे की नाही, असा सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केला.
संविधानाचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मोदींचा शब्द तुम्ही लिहून ठेवा की खुद्द बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. सरकारसाठी संविधान हे रामायण, गीता, महाभारत, बायबल आणि कुराणसारखे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.