पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिराचे लोकार्पण केले. अखेर ५०० वर्षांनी रामलल्ला हे आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. भव्य मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर यंदा देशभरात प्रथमच रामनवमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या रामनवमीच्या शुभदिनी मोठ्या संख्येने अयोध्येत जाण्यासाठी आतुर झाले आहेत. यंदाची रामनवमी आणखी एका कारणामुळे विशेष असणार आहे. ते कारण काय आहे ते, आपण जाऊन घेऊयात.
यंदाच्या रामनवमीदिवशी रामलल्लाच्या मस्तकी सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास साधारणपणे चार मिनिटे रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. राम लल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक ७५ एमएम व्यासाचा असणार आहे. या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत होते, अशी माहिती समोर येत आहे.
रामजन्माच्या वेळेस रामलल्लाचा अभिषेक सूर्यकिरणांनी व्हावा अशी इच्छा मंदिराचे निर्माण सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंदिराचे निर्माण करताना तज्ज्ञांनी विशेष रचना केली आहे. राम मंदिरामधील किरणोत्सव कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात होणाऱ्या किरणोत्सवापेक्षा वेगळा असणार आहे. अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे कोणत्याही दरवाज्यातून किरणं येणार नाहीत तर ती घुमटातून येणार आहेत. या उत्सवाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी १०० एलईडी स्क्रीन्स लावल्या जाणार आहेत. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.