Rajnath Singh On Congress : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अनिल बलूनी यांच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तर या सभेला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस (Congress) पक्षावर हल्लाबोल केला.
यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, मागील काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. हे नेते पक्ष सोडून एनडीएमध्ये सहभाग होत आहेत. या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली आहे.
पुढे राजनाथ सिंह यांनी काँग्रसेची तुलना ही बिग बॉससोबत केली. काँग्रेस नेते हे रोज एकमेकांशी लढत आहेत. टीव्ही शो बिग बॉसप्रमाणे ते एकमेकांचे कपडे फाडत आहेत. तसंच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही वर्षांनंतर काँग्रेस पक्षाला लहान मुलंसुद्धा ओळखणार नाहीत, असं संरक्षणमंत्री म्हणाले.
काँग्रेस पक्षातून नेते पळून जात आहेत. एकानंतर एक नेते पक्ष सोडत आहेत. त्यामुळे मला भीती आहे की, पुढच्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष डायनोसॉरसारखा लुप्त होऊन जाईल, असंही राजनाथ सिंह म्हणाले.