केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी सोनलबेन शाह यांनी आता घेतली असून, गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी प्रचार करणण्यास सुरवात केली आहे. भाजपचे केंद्रीय नेते आणि स्टार प्रचारक असल्याने असल्याने अमित शाह देशभरात विविध मतदारसंघात जाऊन पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. तथापि, उमेदवारी अर्जाच्या एक दिवस अगोदर 18 एप्रिल रोजी शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात रोड शो करणार आहेत. अमित शहा गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
अमित शाह यांच्या पत्नी सोनल शहा यांनी आज गांधीनगरच्या कोलवाडा गावात घरोघरी जाऊन संपर्क साधला. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांच्या घरीही त्यांनी भेट दिली. घरोघरी प्रचारादरम्यान त्यांनी लोकांची भेट घेतली आणि संवाद साधला. गांधीनगरमधून भाजपचे उमेदवार म्हणून अमित शहा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांचा मुलगा जय शहा पहिल्यांदाच प्रचारासाठी आला होता. जय शाह हे बीसीसीआयचे सचिवही आहेत. त्यांनी स्थानिक कार्यकर्ते आणि आमदारांच्या उपस्थितीत वडील अमित शहा यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता.
15 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील मेमनगर भागातील गुरुकुल रोडवरील भिडभंजन हनुमान दादा मंदिरात प्रार्थना करून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. हे मंदिर अमित शाह यांच्यासाठी खूप लकी मानले जाते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत शहा यांनी हनुमानजींचे दर्शन घेतले आणि आरती केली आणि विजयासाठी आशीर्वाद मागितले. तेव्हा शहा यांनी सांगितले होते की, ३१ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वॉर्ड नगरसेवक असताना हनुमानजींचा आशीर्वाद घेऊन पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला होता.
भाजपने आपला प्रचार रथ लाभार्थी कुटुंबाकडे वळवला आहे. अमित शहा यांच्या पत्नी सोनल बेन याही घरोघरी प्रचार करताना सामान्य मतदारांवर तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या कुटुंबांवर लक्ष केंद्रित करताना दिसल्या. सोनल बेन यांनी पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, स्वानिधी योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतर लोकप्रिय योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोनल बेनने सोनीपूर गावातील बहुचर मातेच्या मंदिरातही प्रार्थना केली.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पक्षाच्या प्रचारासाठी देशभरात झंझावाती दौऱ्यावर आहेत. अशा स्थितीत भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघात ‘मी अमित शाह’चा नारा देत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकसभेच्या अखत्यारीतील सर्व विधानसभा जागांना एकदा भेट दिली आहे. मुक्कामात त्यांनी बूथ कार्यकर्ता परिषद, मतदार संवाद आणि सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्या भेटी घेतल्या. याशिवाय सर्व आमदार आपापल्या भागातील संघटनेच्या अधिकाऱ्यांसह मतदारांशी संपर्क साधत आहेत.