विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर करून निवडणूक आयोगाला विनंती करून याबाबत अधिकारी स्तरावर बैठक घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यातील हादगाव येथे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी या भागात झालेल्या अवकाळी पावसाची आपल्याला पूर्ण जाणीव असून स्थानिक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी झालेल्या नुकसानाची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने सुरू करून त्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा आणि खान्देशच्या भागात सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडडाटासह गारपीट आणि आवकाळी पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला असून लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, टरबूज आणि केळी यांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी, गहू या पिकांना देखील त्याचा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आलेल्या या अस्मानी संकटाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे.
मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकारची मोठी अडचण झालेली आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आचारसंहितेचा अडसर दूर सारून अधिकारी स्तरावर बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत देता येईल का याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करून या अडचणीतून मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव इकबालसिंह चहल यांना दिले आहेत. आज हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात मतदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात विज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत जटाळेवाडी येशील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच काही जनावरे मृत्यूमुखी पडली होती. या गरीब शेतकऱ्याला शासनाकडून पाच लाखांची मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.