समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या नीतीमूल्यांच्या आधारे भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या सर्वांगीण विकासात सिंहाचा वाटा असल्यामुळे आणि भारताला अखंड, सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र अशी ओळख करून दिल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाचे आकर्षण बनले आहेत.
अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी असणाऱ्या डॉ बाबासाहेबांचा जगभरात गौरव होत आहे. सीएनएन, आयबीएन सेव्हन, हिस्ट्री, टीव्ही एटीन आदि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात २०कोटी लोकांनी *ग्रेटेस्ट इंडियन* म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची निवड करून त्यांचा सन्मान केला.ऑक्सफर्ड विद्यापीठाने जग घडवणाऱ्या शंभर अलौकिक महापुरुषांची जी यादी तयार केली, त्यातही जागतिक महापुरुषांमध्ये पहिल्या क्रमांकावर तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसऱ्या क्रमांकावर वर्धमान महावीर, तिसऱ्या क्रमांकावर चक्रवर्ती सम्राट अशोक तर चौथ्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांचा मोठा सन्मान केला आहे.
सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिकदृष्टया डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजरचनेत आमूलाग्र बदल घडवून भारतावर सर्वार्थाने अनंत उपकार केले आहेत. त्यांची धर्मांतराची भूमिका पाहिली तर त्यांनी १९३५ पर्यंत हिंदू धर्मातील मनुष्यनिर्मित अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातिभेद संपवण्यासाठी परिवर्तनाची फार मोठी लढाई लढली. परंतू त्यात त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी येवला येथे धर्मपरिवर्तनाचे रणशिंग फुंकले. परंतू धर्मपरिवर्तनाच्या भूमिकेमुळे देशाच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही याची आंतरिक आणि कृतिशील पुरेपूर खबरदारी घेऊन, इथल्याच मातीतला विश्वशांती आणि बंधुत्वाची शिकवण देणारा बुद्ध धम्म स्विकारुन, भारताला सम्राट अशोकाची दूरदृष्टी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केली आहे.
सर्व समाजाला कवेत घेऊन प्रतिभावान आणि सामर्थ्यवान दिशेने नेण्याची बाबासाहेब आंबेडकरांकडे व्हिजन राज्यघटना, हिंदू कोड बिल, समान नागरी कायदा आदी सर्व गुंतागुंतीच्या विषयांमध्ये दिसून येते. राज्यघटनेचा मूळ गाभा- Basic Structure Doctrine ही बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. ‘घटनेत बदल करण्याचे सर्व अधिकार संसदेकडे असावेत, असे पंडित नेहरूंचे मत होते’. परंतू बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले की, घटना संसद निर्माण करते. संसद घटना निर्माण करू शकत नाही. म्हणजेच घटनेचं चरित्रच ज्या बदलांमुळे पालटून जाईल, असे बदल करण्याचे अधिकार संसदेकडे असता कामा नयेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची व्हिजन आजच्या काळात खरी ठरली आहे. नाहीतर मतांच्या राजकारणात, संसदीय बहुमताच्या गदारोळात सापडून राज्यघटनेची कधीच धुळधाण उडाली असती. म्हणूनच डॉ बाबासाहेबांचे खूप मोठे उपकार आहेत आपल्या समाजावर !
▪️बाबासाहेबांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त विनम्र अभिवादन▪️
डॉ.सुनील भंडगे
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे