लोकसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीमधला मुंबईतील जागांचा तिढा आता दिल्लीत पोचायच्या तयारीत आहे. आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड थेट दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्या ह्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.
आता त्या हायकमांडची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून वर्षा गायकवाड नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांची आहे.याआधी सांगली आणि भिवंडीचा तिढा होता. पण तो काही दिवसांनंतर सुटला असला तरी अजून काही जागांवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कायम आहे.
दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच येथे काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचेही मानले जात होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांनीही पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शिवसेनेने ज्या जागांची घोषणा केली, त्यातील जवळपास सर्वच जागा त्यांच्याकडे राहिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्येही नाराजी असल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिसून आले.
काँग्रेसच्या सांगली, भिवंडी यासह दक्षिण-मध्य मुंबई यासारख्या महत्त्वाच्या जागांवर काँग्रेसला पाणी सोडावे लागल्याने नेत्यांमधली नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर माजी मंत्री आमदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी ज्या जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो, अशा जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत, तर ज्या जागांवर आमची ताकद नाही, अशा जागा काँग्रेस पक्षाला दिल्या गेल्या, अशी टीका त्यांनी केली आहे. .