नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज (14 एप्रिल) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन अज्ञातांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या दरम्यान दोन अज्ञातांनी बाईकरून येत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. तर हल्लेखारांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. या घटनेनंतर मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहे.
या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर आली आहे. तसंच सध्या सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सध्या कुख्यात गुंड लाँरेन्स बिश्नोईचे नाव समोर येत आहे. कारण काही महिन्यांपूर्वी सलमान खानला एक धमकीचा मेल आला होता. ही धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून आल्याचं म्हटलं जात होतं. तर लॉरेन्स बिश्नोईनं देखील एनआयएच्या चौकशीत मोठी कबुली दिली होती. बिश्नोईने सांगितले होते की, सलमान खानला त्याच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर ठेवल आहे. कारण 1998 मध्ये सलमानने काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे तो सलमानवर नाराज आहे. तसंच बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते, त्यामुळे बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.यावरूनच आता सलमानच्या घराबाहेर लॉरेन्स बिश्नोईने गोळीबार घडवून आणला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.