बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. आज (14 एप्रिल) पहाटे दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तसंच गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. सध्या पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. तर या घटनेवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ANIशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागामध्ये राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी अनेक लोक सकाळी मॉर्निंग वॉकला येत असतात. तसेच तिथे भाजीवाले-दुधवाले येतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमान खानच्या कुटुंबावर दबाव आहे.
आपण आता पुण्यात आहोत आणि पुण्यात काय चालले आहे ते आपण पाहत आहोत. हे खूप सुशिक्षित असे ठिकाण आहे जिथे लोक शांततेमध्ये राहतात. पण इथे देखील गुन्हेगारी वाढली आहे. मी हा आरोप करत नसून भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, आज पहाटे पाचच्या दरम्यान दोन अज्ञातांनी बाईकरून येत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. तर हल्लेखारांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. या घटनेनंतर मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहे. तसंच सध्या सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.