आज (14 एप्रिल) बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत आज पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या घटनेची माहिती घेत सलमान खानसोबत फोनवरून चर्चा केली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली. त्यानंतर त्यांनी सलमान खानसोबत फोनवरून चर्चा देखील केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खानला सुरक्षे संदर्भात दिलासा दिला.
या धक्कादायक घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना देखील दिली असल्याची माहिती मिळत आहे.