2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने (BJP) आज (14 एप्रिल) आपले संकल्प पत्र जारी केले आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संकल्प पत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपचे सरकार आल्यास पुढील 5 वर्षे काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय मोफत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएम मोदी म्हणाले की, चार ‘जाती’ आहेत तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधानांनी मोफत वीज योजना आणि मोफत धान्य योजनेंतर्गतही अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी स्वानिधी योजना (पीएम स्वानिधी योजना), उज्ज्वला योजना, आयुष्मान योजना आणि इतर योजनांची व्याप्ती वाढवण्याबाबतही घोषणा केली.
येत्या पाच वर्षांसाठी गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोफत रेशन योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 80 कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत रेशन दिले जात आहे. गरिबांचे ताटही आम्ही सुरक्षित ठेवू, असे ते म्हणाले. सरकार स्थापन झाल्यास येत्या पाच वर्षांत पीएम आवास योजनेची व्याप्ती वाढवण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातात. आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत इतर आरोग्य सेवांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनऔषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीने औषधे उपलब्ध करून दिली जातील. याशिवाय, 70 वर्षांवरील वृद्धांच्या सर्व श्रेणींनाही आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.
पंतप्रधान म्हणाले की, उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले जात असून प्रत्येक घरात गॅसची सुविधा पोहोचली आहे. आता स्वस्त स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरात पाईपद्वारे पोहोचवला जाईल. याशिवाय 3 कोटी कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली जाणार आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत सौरऊर्जेद्वारे 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. एवढेच नाही तर सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून लोक वर्षाला हजारो रुपये कमवू शकतात. ते म्हणाले की, मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, पीएम स्वानिधी योजनेची व्याप्ती खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली जाईल.