आज (14 एप्रिल) बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज सकाळी दोन अज्ञातांनी गोळीबार (Firing) केला. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या फुटेजमध्ये दोन अज्ञात लोक मोटारसायकलवर आले आणि त्यांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला आणि नंतर तेथून पळ काढला. या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवती सुरक्षा वाढवली आहे. तसेच या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे.
दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडवीस म्हणाले की, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या घटनेबाबतीच माहिती मिळाली की दिली जाईल. पण, या घटनेवरून कायदा-सुव्यवस्था बिघडली असा अर्थ काढणे चुकीचे आहे.
आज झालेल्या हल्ल्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. तसंच या घटनेवरून ज्या प्रकारे विरोधकांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका केली जात आहे ते योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.