बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानच्या (Salman Khan) घरावर आज पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे पाचच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करत तिथून पळ काढला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच या घटनेनंतर हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोईने घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अशातच आता सलमानच्या घराबाहेर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी एक व्यक्तीने स्वीकारली आहे.
एका व्यक्तीने फेसबुक पोस्टद्वारे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. या पोस्टमधून अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे.
या गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आधीच होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. अशातच आता अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जाबाबदरी स्वीकारली आहे. पण हे अकाउंट फेसबुकवर सर्च केलं जाऊ शकत नाही, कारण त्या अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. तसेच आता पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.
या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने अनमोल बिश्नाईने घेतली आहे. याबाबतची एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला शांतता हवी आहे, जर दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर ते योग्य आहे. सलमान खान आम्ही हे तुला फक्त ट्रेलर दाखवण्यासाठी केलं आहे. जेणेकरून तुला आमची ताकद समजेल. एवढचं नाही तर आम्ही तुला ही शेवटची वॉर्निंग देत आहोत, यानंतर या गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत, असे या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने शेअर केली आहे. यावरून आता या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोईचाच हात असल्याचं स्पष्ट झालं आहे.