पाकिस्तानातील लाहोर येथून एक मोठी बातमी समोर आली. अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराजची (Amir Sarfraz) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. अमीर सरफराजनेच भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची हत्या केली होती. सरबजीत सिंह यांना पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्कराने पकडले होते, त्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.
आयएसआयच्या सूचनेवरून अमीर सरफराजने पाकिस्तानात कैदेत असलेल्या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाची हत्या केली होती. अमीरने सरबजीत सिंह यांचा खूप छळ केला आणि नंतर पॉलिथिनने त्यांचा गळा दाबून खून केला होता.
सरबजीत सिंह हे भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तरनतारनमधील भिखीविंड गावचे रहिवासी होते. 30 ऑगस्ट 1990 रोजी ते अनवधानाने पाकिस्तानी सीमा ओलांडून गेले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर सरबजीतवर लाहोर आणि फैसलाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.