PM Narendra Modi : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आता पश्चिम आशियाई देशांमध्ये तणाव वाढत आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलवर दुतर्फा युद्धाचा धोका वाढत आहे. त्याचवेळी, गाझावरील आयडीएफच्या सततच्या हल्ल्यांमुळे हमास या दहशतवादी संघटनेचे अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतात शांतता, स्थिरता आणि मजबूत परराष्ट्र धोरणाचा पुरस्कार केला आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारतातील स्थिर सरकारच देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पुढे नेऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
गेल्या आठवड्यात रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याच्या लाँचच्या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी प्रचंड बहुमताने सत्तेत परतण्याच्या महत्त्वावर भर दिला. सध्याच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि युद्धग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताला निर्णायक पावले उचलण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भाजपचा निवडणूक जाहीरनामा ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांसह पक्षाच्या नेत्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले की, जगातील काही भागात ‘युद्धासारखी’ परिस्थिती आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, “आज जगावर अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत. अनेक प्रदेश युद्धसदृश परिस्थितीला तोंड देत आहेत आणि जग तणावपूर्ण आहे आणि शांतता नाही. अशा वेळी आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हे एक महत्त्वाचे काम आहे.”