Raj Thackeray : काल (14 एप्रिल) पहाटे बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली. दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली होती. याबाबतची एक फेसबुक पोस्ट स्वत: अनमोलने केली होती. या घटनेनंतर सलमान खानबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या घटनेनंतर सलमान खानची महेश मांजरेकर, अरबाज खान, अर्पिता खान अशा अनेक दिग्गजांनी भेट घेतली. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सलमानची घरी जाऊन भेट घेतली आहे.
दरम्यान, काल अनमोल बिश्नोईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच पोलीस सतर्क झाले आहेत. या पोस्टनंतर तिहार तुरूंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच गोळीबार करण्यासाठी आलेला एक आरोपी विशाल उर्फ काळू हा बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. काळू हा बिश्नोई गँगच्या रोहित गोदारासाठी काम करत असल्याचं म्हटलं जातंय. तर काळूचा हरयाणातील एका व्यावसायिकाच्या हत्येतही सहभाग होता.