Salman Khan : काल पहाटे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर बिश्नोई गँगमधील दोघांनी गोळीबार (Firing) केला. त्यामुळे या घटनेनंतर सलमान खानच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. तसंच या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस आणि गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली आहे.
या घटनेमुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच, खान कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत सलमान खानच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले. या घटनेनंतरही दबंग खानने स्वत:ला शांत ठेवले आहे. पण, सलमानला त्याच्या कुटुंबाची काळजी आहे, असे त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितले आहे.
खान कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने अलीकडेच झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या घटनेनंतर सलमान खानला त्याच्या आयुष्याची चिंता नाही. पण तो आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या संकटात पाहू शकत नाही. त्याला आपल्या कुटुंबाची काळजी आहे. कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने पुढे सांगितले की, सलीम खान यांनी सलमान खानला त्यांचे घर सोडून इतरत्र चांगल्या ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
या घटनेनंतर खान कुटुंब शांतपणे एकमेकांच्या पाठीशी उभे आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाही. मात्र या घटनेनंतर एकमेकांच्या सुरक्षेची चिंता करत सर्वांचीच झोप उडाली आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि त्याचे कुटुंबीय सध्या या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र घराबाहेर गोळीबार झाल्याच्या बातमीने चाहत्यांना आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. इमारतीवर गोळी झाडल्याची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसंच गोळीबार करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलीस लवकरच पकडतील, अशी अपेक्षा आहे.