सरबजीत सिंगच्या (Sarabjit Singh) हत्येचा आरोपी अमीर सरफराज तांबा (Amir Sarfraz) याची रविवारी (14 एप्रिल) पाकिस्तानातील लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. इस्लामपुरा भागात मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमीर सरफराज तांबा यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आणि त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
आता सरबजीत सिंगच्या बायोपिकमध्ये सरबजीत सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सरबजीत सिंगचा मारेकरी अमीर सरफराज तांबाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना रणदीप हुड्डा याने त्याच्या X खात्यावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांने लिहिले आहे की, ‘कर्म, ‘अज्ञात माणूस’ धन्यवाद, मला माझी बहीण दलबीर कौरची आठवण येत आहे आणि स्वपनदीप आणि पूनमला मी प्रेम पाठवत आहे. आज शहीद सरबजीत सिंग यांना थोडा न्याय मिळाला आहे.
कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराज तांबा आणि कैद्यांनी जवळपास एक आठवडा हल्ला केल्यानंतर 26 जून 2013 रोजी सरबजीत यांचा मृत्यू झाला होता. त्यांना 23 वर्षे लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आले होते. अमीर सरफराज तांबा याने भारतीय नागरिक सरबजीतवर विटा आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांची हत्या केली होती. आयएसआयच्या सांगण्यावरून त्याने सरबजीतची हत्या केली होती.
सरबजीत सिंगच्या बायोपिकबद्दल सांगायचे तर, रणदीप हुड्डाचा ‘सरबजीत’ हा बायोपिक 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, दर्शन कुमार आणि रिचा चढ्ढा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात सरबजीत नशेत नकळत भारत-पाक सीमा ओलांडत असल्याचे दाखवले आहे आणि पाकिस्तानी सैन्य त्याला पकडते. नंतर त्याची बहीण दलबीर न्यायासाठी लढते आणि आपल्या भावाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करते.