सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत उबाठा गटाची अवस्था उठ बस सेना झाली असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
सिल्व्हर ओक म्हणाला की उठ आणि काँग्रेस म्हणाला की बस अशी केविलवाणी अवस्था उद्धव ठाकरेंची झाल्याची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डागली. बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी रविवारी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की विरोधी पक्षात स्वत:वर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत. त्यांना त्यांचीच पडलेली आहे. ‘मला पाहा आणि फुले वाहा’, यात विरोधक मग्न आहेत. विदर्भात एक म्हण आहे ‘मले कोन माने मीच माने’ अशी अवस्था विरोधकांची झाल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी नकली शिवसेना आणि असली शिवसेनेतील फरक स्पष्ट केला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे तीच खरी शिवसेना आहे. लोकशाहीमध्ये ज्याच्यांकडे बहुमत असते तो पक्ष मोठा असतो. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली, पक्षाच्या ध्येय धोरणांवर पाणी सोडले आणि स्वतःच्या स्वार्थ आणि खुर्चीसाठी तडजोड केली अशांना जनता माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेल्या विकास कामांना महायुती सरकारने चालना दिली.
मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागातले पाणी त्यांनी बंद केले होते. मोठ-मोठे प्रकल्प बंद केले होते. राज्यात सत्तांतर होताच सर्व कामांवरील स्थगिती उठवली. त्यामुळे आज समृद्धी महामार्गाने इथल्या शेतकऱ्यांना एका दिवसात शेतमाल घेऊन मुंबईत पोहोचता येते. काँग्रेस पक्षानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला होता, असे सांगतानाच बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना कोणी बदलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळक्या घराची उपमा देऊन या पक्षापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, अशी आठवण ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी करुन दिली.
गारपीट आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.