देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) राबवत आहे. ज्या अंतर्गत सरकार लाभार्थ्यांना ₹ 5,00,000 पर्यंतचा मोफत आरोग्य विमा प्रदान करते. तर काल (14 एप्रिल) भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्या दरम्यान आयुष्मान योजनेबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करण्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान भारत’ योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबत असे सांगण्यात आले आहे की, सर्व पात्र ट्रान्सजेंडर आयुष्मान भारत अंतर्गत कव्हर केले जातील. यापूर्वी बीपीएल श्रेणीत येणाऱ्या दुर्बल घटकातील नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचा लाभ दिला जात होता.
अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेच्या कक्षेत आणण्याची घोषणा केली होती. महिला सशक्तीकरण लक्षात घेऊन त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली आयुष्मान भारत या योजनेची घोषणा केली होती. आयुष्मान भारत प्रधान मंत्री-जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत, प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतात. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, आयुष्मान भारत योजना लाभ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या अंतर्गत, आतापर्यंत 50 कोटी लोकांना आरोग्यदायी जीवनासाठी आयुष्मान भारत योजनेचे संरक्षण मिळाले आहे .