Rahul Gandhi : तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. पोलिसांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या उड्डाण पथकाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर येथे उतरल्यानंतर त्याची झडती घेतली. राहुल गांधी केरळमधील वायनाड या त्यांच्या संसदीय मतदारसंघाला भेट देत होते, जिथे ते जाहीर सभेला संबोधित करण्यासह अनेक निवडणूक प्रचार कार्यात भाग घेणार आहेत. ते वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत जिथे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींना तामिळनाडूतून केरळला जावे लागले होते. चार दिवस ते येथे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तर त्यांच्या हेलिकॉप्टर तपासणीचा व्हिडिओही समोर आला आहे. हेलिकॉप्टर उतरताच आयोगाचे अधिकारी पोहोचल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर काही वेळाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बाहेर येतात.
https://twitter.com/ANI/status/1779767910812066244
या तपासाबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. तत्पूर्वी, राहुल यांनी येथील निलगिरी महाविद्यालयात कला आणि विज्ञानाचे विद्यार्थी आणि चहाच्या बागेतील कामगारांची भेट घेतली. तामिळनाडूनंतर राहुल गांधी केरळमधील वायनाडमध्ये पोहोचले. येथे त्यांनी रोड शो केला. रोड शो दरम्यान ते म्हणाले की, वायनाडच्या लोकांनी मला जे प्रेम आणि आपुलकी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वायनाडमधील प्रत्येक व्यक्ती माझे कुटुंब आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतल्यानंतर काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची चौकशी केली जात आहे, याला आमचा कोणताही आक्षेप नाही. पण मग पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करावी. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.”