उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात रविवारी (14 एप्रिल) मुझफ्फरनगरमधील जीआयसी ग्राऊंडवर जाहीर सभेत पोहोचलेल्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी सपा, भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार दारा सिंह प्रजापती यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना मायावती म्हणाल्या की, बसपाने कोणत्याही राजकीय पक्षाशी युती केलेली नाही. बसपा निवडणुकीच्या मैदानात एकटा असून मोठा विजय मिळवेल.
पुढे मायावती यांनी जनतेला बसप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले. तर मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून बसपचे प्रजापती भाजपचे संजीवकुमार बल्यान आणि सपाचे हरेंद्र सिंह मलिक यांच्याशी लढत आहेत.
मायावती म्हणाल्या की, भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता फारच कमी आहे. तसंच पश्चिम उत्तर प्रदेशातील लोक दीर्घकाळापासून वेगळ्या राज्याची मागणी करत आहेत. केंद्रात आमचे सरकार आल्यास पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य बनवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. जर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या तर मतदान यंत्रांशी छेडछाड केली नाही तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही.
भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासनं पूर्ण केले नाही. भांडवलदार आणि उद्योगपतींना अधिक भांडवलदार बनवण्यात आणि त्यांना प्रत्येक स्तरावर संरक्षण देण्यात बहुतांश वेळ गेला आहे. भाजप आणि इतर पक्ष आपल्या संघटना चालवतात आणि याच व्यावसायिकांच्या मदतीने निवडणूक लढवतात, हे इलेक्टोरल बाँड्सच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे, अशी टीकाही मायावती यांनी केली.