सध्या केंद्रीय माजी मंत्री शरद पवार हे चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक आहे’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. तसंच यावरून आता अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. अशातच आज (15 एप्रिल) शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर घुमजाव केला आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.
मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. कारण मी तसं बोललोच नव्हतो. मला पत्रकाराने विचारलं होतं की, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की, मला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी काही वाक्य वापरलं होतं. त्याबाबत मी फक्त स्पष्टीकरण दिलं होतं. यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याची गरज नही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले की, महिलांच्या बाबतीत काही समस्या असतील तर मला वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारा मी पहिला राज्यातला मुख्यमंत्री होता. मी केंद्र सरकारमझ्ये संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला होता. असे अनेक निर्णय माझे आहेत ज्यामध्ये महिलांना सन्मान, प्रतिष्ठा मिळेल याची काळजी मी घेतली आहे, असेही शरद पवार म्हणाले.