रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्यानंतर संपूर्ण मुंबईत भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे, कुख्यात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड करून या घटनेची जबाबदारी घेतली आहे. अनमोल विश्रोईने सोशल मीडियावर पुढच्या वेळी घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, असं म्हटलं आहे.
या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची १५ पथके तयार करण्यात आली आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर, सह पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) लक्ष्मी गौतम आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्यासह मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेनंतर घटनास्थळाच्या आजूबाजूचे ७० हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करण्यात आले आहेत. गोळीबार करणारे दोन्ही हल्लेखोर मुंबई सेंट्रलहून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले आणि वेस्टर्न हायवेवरून दहिसरला पळून गेले. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही हल्लेखोरांनी सलमान खानच्या घरी जवळपास सहा गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी अभिनेत्याच्या घराच्या गॅलरीत सापडली आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने सोशल मीडिया पोस्टमध्ये गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अनमोल बिश्नोईच्या सोशल मीडिया हँडलची चौकशी करत आहेत. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचीही पोलिसांची टीम चौकशी करू शकते, अशी माहिती मिळाली आहे.