लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ANI ला मुलाखत दिली. यावेळी मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ED कारवाईबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भाजप सरकारने लोकांना तुरुंगात पाठवल्याचा’ विरोधी पक्षांचा आरोप फेटाळून लावला आहे आणि म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालयाने, म्हणजेच ईडीने नोंदवलेले सर्वाधिक खटले अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत ज्यांचा कोणताही संबंध राजकारणाशी नाहीये.
पंतप्रधान म्हणाले, “किती विरोधी नेते तुरुंगात आहेत? मला कोणी सांगत नाही आणि हे तेच विरोधी नेते आहेत का जे त्यांचे सरकार चालवत असत ? त्यांना पापाची भीती आहे. प्रामाणिक माणसाला कशाची भीती वाटते? मी मुख्यमंत्री असताना त्यांनी आमच्या गृहमंत्र्याना तुरुंगात टाकले. देशाने हे समजून घेतले पाहिजे की ईडीच्या फक्त ३ टक्के प्रकरणांमध्ये राजकारण्यांचा समावेश आहे आणि ९७ टक्के केसेस राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले जातात.”
यंदाच्या निवडणुकीत एनडीए म्हणजेच भाजपा सरकारने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. त्यात भाजपाने ३७० तर एनडीएने ४०० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे स्टार प्रचारक त्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारसभा घेत आहेत. १० वर्षात झालेले काम तर फक्त ट्रेलर असून, पुढील पाच वर्षांत अजून मोठे निर्णय होणे बाकी आहे असे मोदींचे सांगणे आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला साथ देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.