अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चिंता भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केलीआहे. हिंदूविरोधी हल्ल्यांची ही फक्त सुरुवात असल्याचाही सूचक इशारा त्यांनी दिला आहे. 10 एप्रिल रोजी त्यांनी प्रतिनिधी सभागृहात हिंदूफोबिया, हिंदूविरोधी कट्टरता, द्वेष आणि असहिष्णुतेचा निषेध करणारा ठराव मांडला होता. हा ठराव देखरेख आणि जबाबदारीच्या सभागृह समितीकडे पाठवण्यात आला आहे.
अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन हिंदू ॲक्शन या बिगर सरकारी संस्थेने हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांना वाचा फोडली. तसेच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार श्री ठाणेदार म्हणाले की, अमेरिकेत सध्या हिंदू धर्मावर हल्ले वाढत आहेत. तसेच ऑनलाईन आणि इतर माध्यमातून हिंदू समाजाबद्दल चुकीच्या माहितीचाही प्रसार होताना दिसत आहे.
मी स्वत हिंदू असल्याने मला हिंदू धर्म काय आहे हे माहित आहे. हा अतिशय शांतताप्रिय धर्म आहे. इतरांवर हल्ला करणारा हा धर्म नाही. तथापि, या समुदायाचे अनेकदा चुकीचे वर्णन केले जाते आणि मुद्दाम गैरसमज पसरवला जातो असेही ठाणेदार यावेळी म्हणाले आहेत.
गेल्या काही वर्षांत, हिंदू मंदिरे आणि समुदायांवर हल्ले वाढले आहेत, या हल्ल्यांच्या चौकशीसाठी गुन्हे दाखल केले जात आहेत.मात्र पुढे तपास पूर्ण होऊन कारवाई होताना दिसत नाही आणि न्यायही मिळत नसल्याची चिंता श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली आहे.यामुळे परदेशातले अनेक हिंदू समुदाय भीतीखाली आहेत. कारण स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी पुरेशी कारवाई केलेली नाही,हे आम्हाला सरळसरळ दिसत आहे. “मागच्या काही महिन्यांपासून हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आम्ही पाहत आहोत. हिंदू समाजाविरोधात समन्वयित पद्धतीने हल्ले आणखी वाढतील, असे दिसते. आता वेळ आली आहे, समाजाने आता एकत्र राहिले पाहीजे आणि मी यासाठी खंबीरपणे उभा असेन ”, अशी भावना खासदार ठाणेदार यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणखी एक भारतीय-अमेरिकन विजय साधवल यांनी अमेरिकन हिंदूंबद्दलच्या ‘अमेरिकन मीडियाच्या पक्षपातीपणा’बद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की हा ठराव हिंदू समुदायाचा आवाज उठवण्याची केवळ सुरुवात आहे.आम्ही लोक आहोत. अमेरिकन म्हणून, आम्हाला इतरांसारखे अधिकार आहेत.असे त्यांनी म्हंटले आहे.
हिंदू अमेरिकन फाउंडेशन (HAF) ने शुक्रवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये कॅलिफोर्नियाच्या शेरावली मंदिराच्या तोडफोडीची माहिती शेअर केली होती. .