Udayanraje Bhosale : गेल्या काही दिवसांपासून महायुतीकडून (Mahayuti) साताऱ्यातून (Satara) कोणाला उमेदवारी मिळणार यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. तसंच उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अशातच आता महायुतीने उदयनराजे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
महायुतीने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरूद्ध उदयनराजे भोसले लढणार आहेत.
महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू होता. या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला जात होता. पण भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याची चिन्ह दिसत होती. तसंच काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं होतं. तर आता याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भाजपने आज लोकसभेसाठी त्यांची 12 वी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांचे नाव आहे. तसेच या यादीत पंजाब, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची नावे आहेत. दरम्यान, उदयनराजे भोसले आता 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.