दिशाभूल करणाऱ्या जाहीरात प्रकरणी पतंजलीने सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) माफी मागितली आहे. पतंजली (Patanjali) आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजली उत्पादनांच्या भ्रामक दाव्यांबाबत सर्मोच्च न्यायालयाच बिनशर्त माफी मागितली आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली आहे. आजच्या सुनावणीत देखील रामदेव बाबा यांना दिलासा मिळाला नाहीये. २३ एप्रिलला कोर्टाने रामदेव बाबाना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान, योगगुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की ते दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी जाहीरपणे माफी मागण्यास तयार आहेत. रामदेव आणि बाळकृष्ण यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाला सांगितले की, ‘मी जाहीरपणे माफी मागायला तयार आहे.
आधीच्या सर्व घडामोडी लक्षात घेऊन या प्रकरणाचा विचार करणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कोर्ट म्हणाले, ‘तुम्हाला माफ करायचे की नाही हे आम्ही ठरवलेले नाही. तुम्ही तीन वेळा (सूचनांचे) उल्लंघन केले आहे. पूर्वीचे आदेश आमच्या विचाराधीन आहेत. तुम्ही इतके निर्दोष नाही आहात की कोर्टात काय चालले आहे हे तुम्हाला माहीत नाही.’ पुढील सुनावणी २३ एप्रिलला होणार आहे. रामदेव आणि बाळकृष्ण यांना पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ एप्रिल रोजी बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसानंतर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात पतंजली एमडी बाळकृष्ण यांच्या माफीचा समावेश करण्यात आला. “कंपनीच्या अपमानास्पद वाक्ये असलेल्या जाहिरातीबद्दल आम्हाला खेद वाटतो”, असे बाळकृष्ण यांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.